शेवटची इच्छा..

Posted by मधुरा on 11:12 PM

           एका छोट्या गावात एक शेतकरी राहत असतो. शेतकरी गरीब पण खूप मेहनती असतो. गरीबीतून वर यायला तो खूप कष्ट करत असतो.. देव त्याला त्याच्या मेहनतीचं फळ सुद्धा देतो. त्याच्या घरी सुबत्ता येते. पण आलेल्या श्रीमंतीचा गर्व न करता तो प्रगती करत असतो. त्या शेतकऱ्याला ४ मुलं असतात. पण त्याची मुलं श्रीमंतीत वाढल्यामुळे मेहनत करून पैसे कमावणं त्यांना माहितीच नसतं! पैसे उधळणं आणि मजा करणं हेच त्यांचं आयुष्य असतं.. मुलांचं असं वागणं बघून शेतकऱ्याला खूप काळजी वाटत असते. त्यांनी कष्ट करून काम करावा म्हणून शेतकरी मुलांना खूप समजावतो. पण कोणातही फरक पडत नाही. आपण मुलांना चांगल्या मार्गावर आणू शकलो नाही याचं त्याला खूप दुःख असतं.
          मुलांच्या काळजीमुळे शेतकरी आजारी पडतो. दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत जाते. त्याला कळतं की या आजारातून आपण काही बरे होऊ शकत नाही. तो मुलांना जवळ बोलवतो आणि सांगतो, "या आजारातून मी बारा होईल असं मला वाटत नाही. तुम्हाला मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला.. पण काही फायदा नाही.. माझ्यानंतर तुमचं कसं होणार याचीच मला काळजी वाटते. असो... मला काही झालं तर माझी शेवटची इच्छा पूर्ण कराल का?"
          वडीलांचं असं बोलणं ऐकून सगळ्यांना गहिवरून येतं. ते शेतकऱ्याला म्हणतात, "बाबा, तुमच्या सगळ्या इच्छा आम्ही पूर्ण करू.. तुम्ही जे सांगाल ते करू.. आम्ही कष्ट करून पैसे कमाउ.."
शेतकरी सांगतो, "मी तुम्हाला ४ गोष्टी सांगतो त्या तुम्ही रोज न चुकता करायच्या..
पहिली - सावलीतून जा आणि सावलीतून या..
दुसरी - रोज गोड-धोड खा..
तीसरी - मऊ मऊ झोपा..
चौथी - गावोगावी घरं बांधा.."
काही दिवसांनी शेतकऱ्याचा मृत्यू होतो.. सर्वांनाच खूप दुःख होतं..
           शेतकऱ्याच्या शेवटच्या इच्छेबद्दल त्याचे मुलं विचार करू लागतात. आणि शेतकऱ्यांनी सांगितलेल्या इछेचा मुलं आपल्या सोयीनी अर्थ काढतात!
पहिली गोष्ट, सावलीतून जा आणि सावलीतून या.. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी चारही मुलं स्वतःसाठी कार घेतात. कुठेही ये-जा करण्यासाठी कार वापरतात.
दुसरी, रोज गोड-धोड खा.. यासाठी मुलं घरी आचारी ठेवतात आणि त्याला रोज जेवणात गोड बनवायला सांगतात!
तीसरी, मऊ मऊ झोपा.. मुलं मऊ झोपण्यासाठी मऊ गाद्या बनवून घेतात आणि रेशमाची चादर टाकून त्यावर झोपतात..
चौथी गोष्ट सांगितली असते, गावोगावी घरं बांधा.. चारही मुलं वेगवेगळ्या गावात घरं बांधायला लागतात.
           असंच एक वर्ष उलटून जातं. त्यांच्या जवळ असलेले पैसे संपायला लागतात. कमाईचा मार्गच त्यांच्या जवळ नसतो! त्यामुळे त्यांना कर्ज घेऊन घर चालवावं लागतं. शेतकऱ्याच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी सगळे मुलं विचार करतात की आपल्या वडिलांनी अशी इच्छा का सांगितली? त्यांच्या इच्छेप्रमाणे वागलो आणि घरातली सर्व सुबत्ता गेली! वडिलांनी नेहमीच आपल्याला पैसे जोडायला सांगितले पण शेवटची इच्छा अशी सांगितली की घरात होते नव्हते सगळेच गेले! चारही मुलं शेतकऱ्याला दोष देऊ लागतात!
           मुलं असंच विचार करत असतात तेवढ्यात शेतकऱ्याचा एक मित्र त्यांच्या घरी येतो. मुलांची अशी अवस्था झालेली पाहून त्याला सुद्धा वाईट वाटतं. तो मुलांना विचारतो, "काय रे? तुमची अशी अवस्था कशी काय झाली? तुम्ही इतके श्रीमंत होतात मग एका वर्षात असं काय झालं?"
मुलं खजील होऊन सर्व हकीकत सांगतात.. आणि म्हणतात, "काका, तुम्हीच बघा.. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागलो आणि आमची ही अवस्था झाली! आम्ही बाबांचं ऐकलं हीच आमची चूक झाली!"
           हे सर्व ऐकून शेतकऱ्याचा मित्र त्यांना म्हणतो, "अरे बाळांनो, वडिलांचं ऐकलं ही तुमची चूक नाही.. तर त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला ही तुमची चूक झाली आहे! तुमचे वडील तुम्हाला चुकीच्या मार्गाला नेतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला? अरे, 'सावलीतून जा सावलीतून या' याचा अर्थ सुर्योदया आधी कामावर जा आणि दिवसभर काम करून सूर्यास्तानंतर सावलीतून या! दिवसभर काम करून, थकून, तुम्ही जे जेवल ते तुम्हाला गोडच लागेल! याचाच अर्थ गोड-धोड खा! तसंच थकलेल्या माणसाला दगडावर सुद्धा मऊ आणि शांत झोप लागते. हीच तुमच्या वडिलांनी सांगितलेली तीसरी गोष्ट! आणि गावोगावी घरं बांधा ही चौथी गोष्ट ना? अरे म्हणजे तुम्ही ज्या गावी जाल तिथल्या लोकांना आपलंसं करा. त्यांच्या घरातील एक होऊन राहा. असे घरं तुम्ही गावोगावी बांधा!
           अरे तुमच्या वडिलांना तुम्ही ओळखलंच नाहीत का? त्यांच्या इछेचा इतका चुकीचा अर्थ काढलात? आता तरी त्यांची इच्छा ओळखून कष्ट करा.. आणि सुखा-समाधानानी राहा..."