रावणाचा वध करू शकेल असा रामाशिवाय त्यावेळी कोणीही राजा नव्हता?

Posted by मधुरा on 12:04 AM

          श्रीरामांनी युद्ध करून रावणाचा वध केला आणि सीतेला मुक्त केले हे सर्वांना माहिती आहे. पण त्या वेळी या पृथ्वीवर एकही असा वीर नव्हता का की जो रावणाचा वध करू शकेल? श्रीरामांना सुद्धा हा प्रश्न पडला. रावणाचा वध करून अयोध्येला आल्यावर सर्वांचे अभिनंदन स्वीकारताना श्रीराम ऋषींना विचारतात, "ऋषीवर्य, रावणाचा पराभव करू शकेल असा त्यावेळी एकही राजा नव्हता का?" हृषी रामाला सांगतात, "राम, रावणाचा पराभव करणारे एकाच नाही तर तीन राजे होऊन गेले! एक, दैत्य कुळात जन्माला आलेला आणि वामनाने पाताळात पाठवलेला बलीराजा. दुसरा क्षत्रिय कुळात जन्माला आलेला सहस्त्रार्जुन. आणि तिसरा वानर कुळात जन्मलेला वाली राजा.
          या तिघांनीही रावणाचा पराभव केलेला होता. पण घडले असे की, बली कडून रावण पराजित झाला तेव्हा रावणाचा पिता विश्रवामुनी अतिथी म्हणून बळीच्या दाराशी गेला आणि याचना करून भिक्षारुपाने रावणाची त्याने मुक्तता करून घेतली. सहस्त्रार्जुनाकडून सुद्धा तशीच मुक्तता करून घेतली. रावणाला जिंकणारा तिसरा वीरपुरुष वानर राजा वाली सोबत रावणाने वेगळी पावले टाकली.
           त्यावेळी वानर राष्ट्र आणि राक्षस राष्ट्र ही दोन्ही बलाढ्य राष्ट्रे होती. पहिले रावणाने स्वतःच वालीवर आक्रमण केले. वालीने त्या आक्रमणात रावणाला हरविले. आपण हरलो हे लक्षात येताच रावणाने वालीसोबत अग्निसाक्ष 'सख्य' करून मैत्रीचे नाते जोडले. या मैत्रीच्या तहात रावणाने मोठ्या हुशारीने वानर राष्ट्राच्या दारात १४००० सैन्य उभे केले.
          रावण आणि वाली यांच्यात असे ठरले की 'आपण एकमेकांचे अग्निसाक्ष मित्र झालो आहोत तेव्हा आपण एकमेकांवर कधीही आक्रमण करायचे नाही. उलट एकमेकांना मदत करायची.' इतकेच नाही तर रावणाने मुत्सद्दीपणे वानर राष्ट्राची उत्तर सीमा निश्चित केली आणि त्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःकडे ठेवली. पंचवटी या राज्याच्या सीमेशी रावणाने १४००० सैन्य ठेवले आणि खर, दूषण, त्रिशिरा हे मावसभाऊ असलेले पराक्रमी वीर यांच्याकडे त्याचे नेतृत्व दिले. आणि या तिघांवर लक्ष ठेवायला सख्खी बहिण शूर्पणखा हिची योजना केली. मानव आणि वानर राज्यांच्या सीमेवर रावणाने हेतुपूर्वक सैन्य उभे केले. कारण मानव आणि वानर राष्ट्रात मैत्री झाली तर रावणाला धोका उत्पन्न झाला असता!"
           हृषी रामाला पुढे सांगतात की, "रामा, या तिघांनीही रावणाचा प्रभाव केला होता. रावण श्वेतद्वीपात गेला असताना तेथील स्त्रियांनी सुद्धा रावणाचा पराभव केला होता. पण त्याला मारण्यात तुझाच मोठेपणा का.. तर.. या सर्वांच्या बाबतीत झाले काय की, त्यांनी स्वतःचा वैयक्तिक पराक्रम सिद्ध केला. शक्तीचा उपयोग स्वतःपुरता केला. पूर्ण त्रिभुवनातील लोकांना रावण त्रास देत होता. त्या लोकांचा त्रास वाचवावा ही कल्पना सुद्धा त्यांच्या मनाला शिवली नाही. ते महान कार्य तू केलेस.सर्वांना निर्भयता मिळवून दिलीस. सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देण्याकडे पराक्रमाचा उपयोग तू केलास यातच तुझा मोठेपणा आहे.."
          व्यक्तीचा मोठेपणा हा त्याच्या पराक्रमावर नाही तर त्याच्या निर्णयावर असतो.


* ही गोष्ट मी 'वाल्मिकी रामायणावरील प्रवचने' या वं. लक्ष्मीबाई केळकर यांच्या पुस्तकात वाचली आहे.*