भक्त प्रल्हाद

Posted by मधुरा on 1:39 AM

          आज फाल्गुन महिन्यातली पोर्णिमा. म्हणजेच होळी पोर्णिमा. आजच्या दिवशी वाईटाचा नाश करून भक्तीचा विजय झाला. ही गोष्ट आहे भक्त प्रल्हादाची.
           हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता. त्याची राणी कयाधू. हिरण्यकश्यपू आणि कयाधू यांचा मुलगा प्रल्हाद. हिरण्यकश्यपूला अमर व्हायचं असतं. पण जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू हा ठरलेलाच! मग तो युक्ती करून मृत्यूला चकवण्यासाठी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतो आणि वर मागतो, "मला कोणत्याही मनुष्याच्या, देवाच्या, राक्षसाच्या आणि प्राण्याच्या हातून सकाळी, रात्री, घरात किव्वा घराच्या बाहेर, जमिनीवर किंव्वा आकाशात मृत्यू येऊ नये."
           असा वर मिळाल्यावर विष्णू चा द्वेष करणारा हिरण्यकश्यपू उन्मत्त होतो. मी आता अमर झालो.. मला कोणी मारू शकत नाही.. मी परिपूर्ण झालो.. मी आता देवांची बरोबरी करू शकतो असा त्याचा समाज होतो. आणि असा उन्मत्त झालेला हिरण्यकश्यपू फर्मान सोडतो की, "माझ्या राज्यात कोणीही विष्णूची भक्ती करायची नाही. माझी पूजा करा. आणि जो असे करणार नाही त्याला मृत्यू दंड दिला जाईल." मरणाच्या भीतीने सर्व त्याची आज्ञा पाळतात. पण त्याच्याच घरी त्याचा मुलगा प्रल्हाद हा त्याच्या आई सारखा, कयाधू सारखा विष्णू भक्त असतो. तो हिरण्यकश्यपूचा हुकुम मानायला तयार नसतो.
           हिरण्यकश्यपू ला जेव्हा कळतं की त्याचा मुलगाच त्याचा हुकुम पळत नाही तेव्हा त्याला राग येतो. तो प्रल्हादाला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. पण प्रल्हाद म्हणतो, "माझ्या देवाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. जन्म आणि मृत्यू माझ्या देवाच्याच हातात आहे. मी विष्णुभक्ती नाही सोडणार." हे ऐकून हिरण्यकश्यपूला वाटतं प्रल्हाद त्याचा अपमान करतोय. त्याला वाटतं जर मुलगाच माझं ऐकत नाही तर प्रजा कशी ऐकेल! प्रल्हाद खूप समजावून पण समजत नाही हे पाहून हिरण्यकश्यपूला खूप राग येतो आणि तो हुकुम देतो की, "प्रल्हादाचा कडेलोट करा.."
           कडेलोट करण्यासाठी शिपाई प्रल्हादाला पहाडावर घेऊन जातात. प्रल्हाद मात्र डोळे बंद करून फक्त विष्णूचेच नाव घेत असतो. हिरण्यकश्यपू त्याला पुन्हा सांगतो की, "विष्णूचं नाव सोडून माझं नाव घे. तर तुझा जीव वाचेल." पण प्रल्हाद विष्णूच्या नामस्मरणात तल्लीन झालेला असतो. आणि राजाच्या सांगण्यावरून शिपाई प्रल्हादाला पहाडावरून खाली टाकून देतात. पण भक्तांची काळजी पण देवाला असतेच! पहाडावरून पडणाऱ्या प्रल्हादाला विष्णू अलगद हातात झेलतात..आणि त्याचा जीव वाचवतात.
           इकडे सुखरूप परत आलेल्या प्रल्हादाला बघून हिरण्यकश्यपू चिडतो! इतक्या वरून पडून सुद्धा प्रल्हादाला काहीच कसं लागला नाही?? प्रल्हाद सांगतो त्याला, "मला माझ्या देवानी वाचवला. तो माझ्या पाठीशी असताना मला कशाचीच भिती नाही!" हे ऐकून पुन्हा हिरण्यकश्यपू ला राग येतो आणि हुकुम देतो की, "प्रल्हादाला उकळत्या तेलात टाका."
राजाचे शिपाई शिक्षेची तयारी करतात. तेल उकळतात. आणि प्रल्हादाला शिक्षेसाठी घेऊन येतात. हिरण्यकश्यपू प्रल्हादाला पुन्हा विचारतो, "तू माझी आज्ञा मानणार का?" पण प्रल्हाद विष्णूचेच नाव घेतो आहे हे पाहून प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकण्यात येतं!! पण देव तारी त्याला कोण मारी?? प्रल्हादाचा तेलाला स्पर्श होताच तेल थंड गार!! आणि प्रल्हाद नामस्मरणात तल्लीन...
           आपल्या शिक्षेतून  विष्णू त्याला वाचवतात, प्रल्हादावर काहीही परिणाम होत नाही हे पाहून हिरण्यकश्यपू विचारात पडतो. तेव्हा हिरण्यकश्यपू ची बहिण होलिका त्याच्याकडे येते आणि सांगते, "माझ्याकडे एक उपाय आहे. मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते." होलिकेला सुद्धा एक वर मिळाला असतो ज्यामुळे तिला अग्नी जाळू शकत नाही. अग्नीचा तिच्यावर काहीही परिणाम होती नाही. हिरण्यकश्यपू ला होलिकेचा विचार आवडतो. आणि तो प्रल्हादासाठी चिता रचण्याची आज्ञा देतो.
           चिता रचली जाते. आणि शिक्षेसाठी प्रल्हादाला घेऊन येतात. रचलेल्या चितेवर होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसते. प्रल्हाद डोळे बंद करून नामस्मरण करतो. आणि हिरण्यकश्यपू च्या सांगण्यावरून चिता पेटवली जाते. बघता बघता पूर्ण चिता पेटते. आगीच्या मोठ्या मोठ्या ज्वाळा उंच होत जातात.. लाकडं धडधडून पेट घेतात. पण प्रल्हादाला काहीही होत नाही. तो नामस्मरण करतच असतो. थोडा वेळ होलिकेला अग्नीचा काही त्रास होत नाही. कारण तिला तसा वर मिळालेला असतो. पण जसजसं अग्नी रौद्र रूप धारण करते तसं होलिकेला अग्नीचे चटके बसू लागतात.. हळू हळू होलिका त्या अग्नीत जळू लागते. पण नामस्मरण करत असलेल्या प्रल्हादाला अग्नी स्पर्श देखील करत नाही. थोड्याच वेळात होलिका त्या अग्नीत पूर्णपणे जळून जाते. आणि प्रल्हाद  अगदी सुखरूप अग्नीच्या बाहेर येतो.
अशा प्रकारे होलिका म्हणजेच वाईट प्रवृत्ती नष्ट होते. आणि विष्णू त्यांच्या भक्ताला सगळ्या संकटातून सुखरूप सोडवतात. आपण सुद्धा आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींची होळी करून देवावर विश्वास ठेवावा. कारण देव पाठीशी असेल तर काहीही अशक्य नाही.
या पुढे विष्णू हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाला कसं वाचवतात हे पुढच्या गोष्टीत....