आरुणीची गुरुभक्ती

Posted by मधुरा on 11:29 PM

          आजची गोष्ट आहे एका शिष्याची.. धौम्य ऋषींच्या एका शिष्याची. आरुणीची.. धौम्य ऋषींच्या आश्रमात आरुणी नावाचा एक शिष्य होता. आरुणी हा खूप हुशार, सालस आणि समजूतदार होता. त्या मुळे तो धौम्य ऋषींचा लाडका शिष्य होता. आणि तो लाडका शिष्य असल्यामुळे बाकी शिष्य त्याचा हेवा करायचे!
           पावसाळ्याचे दिवस होते. धौम्य ऋषी सगळ्या शिष्यांना आश्रमात शिकवत होते. तेवढ्यात आभाळ भरून येतं. मुसळधार पावसाचे लक्षण दिसायला लागतात. धौम्य ऋषी सगळ्या शिष्यांना सांगतात, "मुसळधार पाऊस येणार असं दिसतंय. आपल्या शेतावर जो बांध घातलाय तो या पावसासमोर टिकेल असं वाटत नाही. तुम्ही सगळे शेतावर जा आणि तो बांध पक्का बांधा. नाही तर सगळं पिक वाहून जाईल."
           त्या काळात आश्रमासाठी लागणारे धान्य आश्रमाच्या शेतीतच पिकवले जात असे. म्हणून शेतातले पिक वाहून जायला नको!
           ऋषींनी सांगितल्यावर सगळे शिष्य शेताकडे जायला निघतात. तेवढ्यात पाऊस सुरु होतो. आणि हळू हळू त्याचा जोर वाढत जातो. इतका मुसळधार पाऊस पाहून शिष्य घाबरतात. आणि शेताकडे न जाता आश्रमात परत जातात. पण आरुणी सगळ्यांसोबत परत जात नाही. गुरूंनी सांगितलेले काम पूर्ण न करता कसं परत जायचं असा विचार करून तो शेताकडे जातो. तिथे जाऊन पाहतो तर बांध तुटत आलेला.. आरुणी बांध नीट बांधायचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो..
           इकडे आश्रमात सगळे आरुणी ची वाट बघत असतात. पाऊस पण मुसळधार पडत असतो त्या मुळे त्याला मदत करायला कोणी शिष्य जात नाही. पाऊस थांबण्याची वाट बघत बघत रात्र सरून दिवस उजाडतो. पण आरुणी काही परत येत नाही. सकाळी ऋषींना आरुणी दिसत नाही. ते आरुणी बद्दल शिष्यांना विचारतात. सगळे शिष्य घाबरतात! त्यांना माहितीच नसतं आरुणी कुठे आहे... तसं ते गुरूंना सांगतात. ऋषींना त्याची काळजी वाटायला लागते.. ऋषी आणि सगळे शिष्य आरुणीला शोधायला बाहेर पडतात.. शोधत शोधत ते सगळे शेतावर येतात तेव्हा त्यांना बांधाच्या जागेवर आरुणी झोपलेला दिसतो!
 ऋषी आरुणी जवळ जाऊन त्याला उठवतात आणि विचारतात, "अरे बाळा.. तू इथे का झोपलेला आहेस?"  आरुणी त्यांना सांगतो, " गुरुजी तुम्हीच सांगितलं ना बांध नीट बांधायचा आहे... पण मी खूप प्रयत्न केले तरी तो बांधला जात नव्हता. सगळ्या पिकाचं नुकसान झालं असतं.. म्हणून मीच इथे आडवा झोपलो. तुमची आज्ञा कशी मोडणार?" ते ऐकून ऋषींना खूप गहिवरून येतं आणि ते आरुणीला कवटाळतात.. आणि बाकी शिष्यांना सांगतात, "बघा.. तुम्ही आरुणीला नाव ठेवत होतात न? पण त्याच्या सारखी गुरूंवर भक्ती कोणीच दाखऊ शकलं नाही. गुरूंची आज्ञा पाळण्यासाठी त्याने स्व:ताची सुद्धा पर्वा केली नाही.."