प्रेम संदेश..

Posted by मधुरा on 12:54 AM

           संस्कृतातील सर्वात पहिली प्रेम कथा...
           कुबेराची राजधानी अलकापुरीमधली गोष्ट... यक्षराज कुबेराच्या पूजाघरात सर्व काम करण्यासाठी एका यक्षाची नियुक्ती होते. यक्षाचं त्याच्या बायकोवर जीवापाड प्रेम असतं. कामाच्या निमित्तानी सुद्धा त्याला तिच्या दूर राहणं जमत नाही.. त्याचा परिणाम असा होतो की एक दिवस त्याच्याकडून कुबेराच्या कामात चूक होते आणि पुजेची तयारी करायला उशीर होतो.. कुबेराला हे सहन होत नाही आणि तो यक्षाला शिक्षा म्हणून १ वर्ष देशाच्या बाहेर हाकलून देतो.. आणि म्हणतो, "ज्या पत्नीच्या विचारात राहून तू ही चूक केली, आता तुला १ वर्ष तिचा विरह सहन करावा लागेल.. तुला एकट्यालाच १ वर्ष देशाच्या बाहेर राहावं लागेल!"
           कुबेरानी दिलेली शिक्षा ऐकून यक्ष कासावीस होतो.. पण काही पर्याय नसतो! १ वर्ष घालवण्यासाठी तो रामगिरी पर्वतावर ऋषींच्या आश्रमात जातो आणि शिक्षा संपण्याचे एक एक दिवस मोजू लागतो.. ज्या पत्नीच्या विरहात तो एक क्षण सुद्धा राहू शकत नव्हता, तिच्या विरहात तो आठवणीने कासावीस होतो.. तब्बेत खालावते..
           आठवणीत दिवस मोजत मोजत काही महिने निघून जातात.. उन्हाळ्याचे दिवस संपून आषाढ महिना येतो. आषाढ महिन्यातल्या मेघ बघून त्याला त्याच्या पत्नीची तीव्रतेने आठवण येते.. त्याच आठवणीत तो कितीतरी वेळ तसाच मेघांकडे बघत बसतो.. विचार करतो की 'माझी तिच्या आठवणीने ही अवस्था झाली आहे तर माझ्या पत्नी सुद्धा आठवणीने व्याकूळ झाली असणार..' असाच मेघांकडे पाहता पाहता त्याच्या मनात विचार येतो की, 'या मेघांच्या माध्यमातूनच मी माझा निरोप माझ्या पत्नीला पाठवू काय?'
           पत्नीला निरोप पाठवण्याच्या विचारानी आनंदी झालेला यक्ष त्या मेघाजवळ जाऊन त्याची पूजा करतो.. स्तुती करतो.. आणि त्याला स्वतःची सर्व हकीकत सांगतो. पुढे त्याला विनवतो की, "तू पृथ्वीवर तापलेल्या जीवांना तुझ्या थंडाव्याने शांत करतो, तसंच माझ्या आठवणीने व्याकूळ झालेल्या माझ्या पत्नीला तू तुझ्या शीतल वर्षावानी आल्हादित करू शकतो.. माझा निरोप तूच तिच्या पर्यंत नेऊ शकतो.."
त्या मेघाला विरहात कृश झालेल्या यक्षाची दया येते.. तो निरोप पोहोचवण्यासाठी संमती देतो.. आपला निरोप पत्नीपर्यंत पोहोचणार या विचारात यक्ष आनंदित होऊन मेघाला पत्नीला सांगण्यासाठी निरोप देतो.. आणि अलकापुरीला जाण्याचा मार्ग समजावून सांगतो.
           यक्षानी सांगितलेल्या मार्गांनी तो मेघ अलंकापुरीत यक्षाच्या घराजवळ जाऊन पोहोचतो. पाहतो तर यक्षाच्या पत्नीची अवस्था सुद्धा याक्षाप्रमाणे व्याकूळ झालेली.. मेघ यक्षाच्या पत्नीला यक्षाचा निरोप देतो, "मी इथे इतक्या दूर सुद्धा सतत तुझी आठवण करत आहे.. निसर्गाच्या प्रत्येक सौंदर्यात मला फक्त तुझेच दर्शन होत आहे.. तुझ्या इतक्या दूर राहिल्यामुळे कशातही माझे मन रमत नाही.. मला माहित आहे तुझी अवस्था सुद्धा याहून वेगळी नक्कीच नाही. पण तू धीर धर. माझी शिक्षा संपायला आता थोडेच महिने उरले आहेत. हे काही महिने तू स्वतःची काळजी घे. मी लवकरच तुझ्याजवळ परत येईन.."
           यक्षाचा निरोप ऐकून त्याच्या पत्नीला खूप आनंद होतो. शिक्षेचे राहिलेले काही महिने घालवायला तिला धीर मिळतो. पण जेव्हा कुबेराला कळतं की शिक्षा मिळालेल्या याक्षानी त्याच्या पत्नीला मेघाकडून संदेश पाठवला, तेव्हा कुबेराला सुद्धा त्याची दया येते आणि तो यक्षाची शिक्षा माफ करतो आणि त्याला परत बोलावून घेतो..
           यक्ष आणि त्याची पत्नी पुन्हा एकदा सुखाने राहू लागतात.. आणि कुबेर सुद्धा त्या दोघांना पुन्हा काही दुःख होणार नाही याकडे लक्ष देतो..