ध्रुव

Posted by मधुरा on 11:47 PM

          तुम्हाला ध्रुव तारा माहिती आहे नं? त्याचीच ही गोष्ट. उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती... एक नावडती... आवडत्या राणीचं नाव सुमती. आणि नावडत्या राणीचं नाव सुनीती. सुनीतीचा मुलगा ध्रुव. आवडत्या राणीचं मुलगा सुद्धा आवडताच असतो.. आणि नावडत्या राणीचं मुलगा नावडता!! ध्रुव ला सुमती चा मुलगा राजाजवळ जाऊ देत नव्हता. राजाकडून फक्त स्वतःचे लाड करून घ्यायचा! सतत राजाच्या जवळ असायचा.. मग ध्रुव ला राजाच्या जवळ जाण्याची संधीच मिळायची नाही! एकदा राजाच्या जवळ कोणी नाही असं बघून ध्रुव राजाजवळ जातो.. राजा ध्रुव ला मांडीवर बसून त्याचे लाड करत असतो.. तेवढ्यात राजाची आवडती राणी सुमती येते. ध्रुव ला राजाच्या मांडीवर बसलेला बघून तिला राग येतो.. ती ध्रुव ला राजाच्या मांडीवरून खाली ओढते.. आणि तिथून त्याला हाकलून देते!
          ध्रुव ला खूप वाईट वाटतं.. तो आई जवळ जातो आणि रडत रडत सगळं सांगतो.. आणि विचारतो, "मला बाबा का नाही लाडवत ग? मला का त्यांच्या जवळून ढकलून दिलं?" सुनीती ध्रुव ला जवळ घेते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते.. त्याला सांगते, "बाळा, मी आहे न तुला लाडवायला... आणि देवबाप्पा पण आहे नं.. तू त्याला विचार. तो तुला नाकी सांगेल.." ध्रुव आई ला विचारतो, "देवबाप्पा ला कसं विचारू? तो कुठे भेटेल मला?" सुनीती सांगते, "देवाशी बोलायचं असेल तर खूप तपश्चर्या करावी लागते.." ध्रुव विचारतो, "तपश्चर्या कशी करतात?" सुनीती त्याला सांगते, "तपश्चर्या करायला एकांत असावा लागतो.. त्यासाठी जंगलात जावं लागतं. आणि तिथल्या अन्नावर राहून देवाचं नाव घ्यायचं असतं..
          रात्री आई झोपली आहे असं बघून ध्रुव चुपचाप बाहेर पडतो.. आणि जंगलाकडे जायला लागतो.. आईनी सांगितल्या प्रमाणे तो तिथलं अन्न खाऊन देवाची तपश्चर्या करतो. असे खूप दिवस जातात.. पण ध्रुव तपश्चर्या थांबवत नाही. निरंतर त्याची तपश्चर्या सुरु असते. आणि एक दिवस विष्णू प्रसन्न होतात आणि ध्रुव ला दर्शन देतात आणि विचारतात, "बाळा, तू इतका लहान असून का इतकी तपश्चर्या करतोय? काय हवंय तुला?" ध्रुव म्हणतो, "देवा मला माझी सावत्र आई बाबांजवळ जाऊ देत नाही.. मी बाबांजवळ गेलो होतो तेव्हा मला त्यांच्या जवळून हाकलून दिले.. आई म्हणाली देवाला विचार.. तूच संग देवा.. मला का हाकलून दिलं?" ध्रुव रडायला लागतो... इतका लहान मुलगा तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करतो आणि हळवा होऊन रडायला लागतो.. हे बघून देवाला गहिवरून येतं. देव ध्रुव ला जवळ घेऊन समजावतात आणि विचारतात, "तू तपश्चर्या करून मला प्रसन्न केलं आहे. तुला काय हवं ते सांग." ध्रुव देवाला म्हणतो, "देवा मला अशी जागा दे जिथून मला कोणीही हाकलू शकणार नाही." देव त्याला म्हणतात,"तथास्तु"
          देव ध्रुव ला अढळपद देतात. तिथून त्याला कोणीही हलऊ शकत नाही.ध्रुवनी आपल्या कठीण तपश्चर्येने अढळपद मिळवले. आकाशात नेहमी एकाच जागेवर दिसणारा ध्रुव तारा हाच आपल्या गोष्टीतला ध्रुव.