हाडाराणी

Posted by मधुरा on 11:06 PM

          भारतीय स्त्री ही नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेली आहे. जिजामाता, झाशीची राणी ही नावं आपल्यासाठी काही नवीन नाही. अशाच एका वीर राणीची ही गोष्ट आहे. हाडाराणी.
           चुडावत हाडा हा एक तरुण राजपूत राजा. त्याची राणी हाडाराणी..दोघांचंही नुकतंच लग्न झालेलं.. अप्सरेसमान राणीवर राजाचं खूपच प्रेम.. लग्नानंतर काही दिवस जात नाही तोच चुडावत राजावर औरंगजेबानी हल्ला केला. चुडावत राजानेही त्याला चांगलाच प्रतिकार केला.. पण औरंगजेबाच्या चाळीस हजार सैन्यापुढे त्याचे सैन्य जास्त वेळ टिकणार नाही हे त्याला कळलं.. चुडावत राजानी त्याच्या राज्यात फर्मान पाठवलं की, "वृद्ध, अपंग आणि बालक या शिवाय कोणीही घरी राहायचं नाही. सर्वांनी सैन्यासोबत युद्धाला जायचं!"
           युद्धाची तयारी घराघरात सुरु झाली.. राज्यातली माणसं राष्ट्रभक्तीत स्वतःला, कुटुंबाला विसरून लढायला निघाली.. दुंदुभी वाजू लागली.. सैन्य मोठ्या थाटात लढाईला निघालं.. इकडे हाडाराणी किल्ल्यावरून सैन्याचा थाट बघते. सैन्याच्या सर्वात समोर राजा दिसेल अशा अपेक्षेने पाहणाऱ्या हाडाराणीला राजा मात्र सैन्याचं नेतृत्व करताना दिसत नाही. राजाला शोधण्याचा ती खूप प्रयत्न करते. पण सैन्यासमोर फक्त सेनापती असतो. राणी दासीला म्हणते, "सर्व सैन्य सेनापतींच्या नेतृत्वाखाली गडाच्या पायथ्याशी पोहोचलं.. पण राजे दिसत नाहीत!" दासी म्हणते, "असं कसं होईल? राजे सर्वांच्या पुढे गेले असतील.."  तेवढ्यात एक दासी निरोप घेऊन येते, "राणीसाहेब, महाराज मागच्या दारानं येत आहेत.."
            चुडावत राजा राणीला भेटायला येतो.. राणी विचारते, "महाराज, सारं सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी जाताना मी पाहिलं.. तुमचं दर्शन होईल या इच्छेने मी तुम्हाला शोधात होते.. नेतृत्व सेनापती करत होते.. तुम्ही दिसलाच नाहीत.." राजा राणीला सांगतो, "सेनापतीला पुढे पाठऊन मी तुम्हाला भेटायला आलो आहे. औरंगजेबाशी युद्ध आहे.. काय सांगावं.. कदाचित आमचं हे शेवटचं युद्ध ठरेल.. हा विचार मनात आला आणि तुम्हाला भेटायला आलो. अप्सरे समान तुम्हाला पुन्हा पाहता येणार नाही या कल्पनेनं हृदयाचा थरकाप झाला! नवविवाहित वधूवरांवर असा क्रूर प्रसंग देवानी का आणावा?"
           हाडाराणी  चुडावत राजाला समजावण्याचा प्रयत्न करते, "महाराज, राजपुतांच्या जीवनात हे प्रसंग काय नवीन आहेत? क्षत्रियाचं लग्न आधी तलवारीशी लागतं मग वधुशी.. तलवार हीच क्षत्रियाची खरी सोबतीण!" राजा म्हणतो, "मला हे सर्व माहित आहे.. पण तरीही मी आजचा दिवस तुझ्यासोबत राहणार. उद्या सकाळी सैन्यासोबत जाणार.." राणी विचारते, "आणि आपलं सैन्य? रात्री तंबूत विश्रांती घेताना त्यांच्यावर अचानक शत्रूने हल्ला केला तर? अशा प्रसंगी आपले मार्गदर्शन न मिळाल्यामुळे सैन्याची दाणादाण उडेल.. आपण या शरीराच्या मोहात पडून कर्तव्य विसरलात.." हे ऐकून राजा चिडतो, "आम्हाला तत्वज्ञान ऐकायचे नाही.." राजा समजाऊन पण समजत नाही हे पाहून राणी निराश होते आणि आतल्या खोलीत जाते.. विचार करत असते की काय केले तर राजाला कर्तव्याची जाणीव होईल..
           थोडा वेळ निघून जातो.. राजा राणीची वात बघत असतो तेवढ्यात एक दासी हातात मोठा तबक घेऊन येते. त्यावर कापडाखाली काही वस्तू असते. राजा तबकावारचे कापड दूर करतो.. तर त्या तबकात हाडाराणीचं शीर असतं!! राजाच्या पायाखालून जमीनच सरकते! ज्या राणीवर इतका प्रेम केलं तिचं शीर!!! दासी राजाला राणीनी लिहिलेला पत्र देते. राणीनी लिहिलं असतं, "महाराज, आपल्या क्षत्रिय धर्माच्या आड हा देह येऊ नये म्हणून हा देहच नष्ट करीत आहे. विजयी होऊन या महाराज.. आपण प्राणपणाने लढून राज्याचे रक्षण करावे आणि माझ्या आत्म्याला शांती द्यावी...."
           राजा हे वाचून सुन्न होतो. कपाळावर हात घटत दाबून बसतो... पण थोड्यावेळानी एकदम उठतो.. म्हणतो, "सर्व पाश तोडून गेलीस तू राणी.. राष्ट्रासाठी बलिदान दिलेस.. सर्व मोह संपले.. आता फक्त शत्रूला मारण्याचा ध्यास.. आता मी मारेन किंव्वा मरेन.."