राम हरवला !!

Posted by मधुरा on 10:51 PM

          वाल्मिकी ऋषी रामायण ग्रंथ लिहित होते तेव्हा त्या ग्रंथाची कीर्ती सगळीकडे पसरली.. हा अद्वितीय ग्रंथ प्रत्येकाला हवाहवासा वाटू लागला.. त्यामुळे हा ग्रंथ पूर्ण होताच त्याच्या मालकीकरता देव, मानव आणि दानव एखाद्या इस्टेटीकरता भांडावं तसं भांडू लागले! मानवांचा दावा असा होता की, राम हा देव असला तरी तो मानव रुपात अवतरला. म्हणून रामायणावर मानवांचा हक्क आहे. देव म्हणाले की, राम मानव रुपात अवतरला असला तरी तो विष्णूचा अंश आहे, तेव्हा रामायण देवांचे आहे! तर दानवांचे म्हणणे अगदी वेगळे.. ते म्हणतात की रामायण हा दैत्यराज रावणाच्या पराक्रमाचे वर्णन करतो म्हणून रामायण दानवांचे आहे!
           या तिघांच्याही भांडणाला कडाक्याची सुरवात झाली.. कोणीही माघार घेईना.. म्हणून सार्वजन भांडण मिटवायला ब्रह्मदेवाकडे जातात.. पण ब्रह्मदेव म्हणतात, "या भांडणाचा निकाल काढणे मला अशक्य आहे. तुम्ही महादेवांकडे जा!"
           सर्वजण महादेवांकडे जातात आणि भांडणाचा निकाल देण्याची प्रार्थना करतात..
महादेव म्हणतात, "तुमचे तिघांचेही म्हणणे बरोबर आहे. तेव्हा तिघांमध्ये याची समान वाटणी करू!"
महादेव सर्वांची वाटणी बरोबर समान करतात.. शतकोटी श्लोक असलेल्या रामायणाची वाटणी करताना देव, मानव आणि दानव या तिघांच्या वाट्याला प्रत्येकी ३३३३३३३३३ (तेहतीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे तेहतीस) श्लोक येतात.
           महादेव म्हणतात, "हे बघा.. समान वाटणी झाली. आता एकाच श्लोक वाटायचा राहिला आहे. या श्लोकाची अक्षरे आहेत बत्तीस.. तेहतीस असती तर प्रत्येकाला अकरा देता आले असते.. पण इथे बत्तीस अक्षरे आहेत तर तुम्हाला दहा दहा अक्षरे देतो आणि दोन अक्षरे मला ठेऊन घेतो.."
           तिघांनीही महादेवाची कल्पना पसंत केली. त्यांनी विचार केला की महादेवांनी पक्षपात न करता आपल्यात वाटणी केली.. आता दोन अक्षरे म्हणजे अगदीच क्षुल्लक गोष्ट आहे! ते द्यायला काही हरकत नाही.. आणि तिघंही महादेवाला ते दोन अक्षरे द्यायला होकार देतात.. हा होकार मिळाल्यावर महादेव काय ठेऊन घेतात माहिती आहे?   "राम"
           म्हणून ज्या रामायणातून राम हरवला आहे त्याची कितीही पारायणं केली तरी काय फायदा? तो राम शोधावाच लागेल!!