संत एकनाथ

Posted by मधुरा on 8:57 PM

          पैठणचे संत एकनाथ यांचा आज उत्सव. श्री एकनाथषष्ठी.. हा उत्सव पैठणला एकनाथ महाराजांच्या वाड्यावर खूप थाटामाटात साजरा करण्यात येतो.  त्या काळातल्या त्यांच्या वाड्याची अजूनही काळजी घेतली जाते. स्वतः श्रीकृष्णांनी श्रीखंड्याच्या रुपात एकनाथ महाराजांच्या घरी राहून त्यांची सेवा केली. घरची सर्व कामं केली.. नदीवरून पाणी भरलं.. आणि एकनाथांना जेव्हा कळलं की श्रीखंड्या दुसरा तिसरा कोणी नसून श्रीकृष्ण आहेत.. तेव्हा श्रीकृष्ण एकनाथांच्या वाड्यात देवघरासमोर असलेल्या खांबात लुप्त झाले.. तो खांब आजही बघायला मिळतो. आजच्या दिवशी हजारो भाविक पैठणला एकनाथ महाराजांच्या वाड्यावर उत्सव साजरा करायला जातात. श्रीखंड्या पाणी भारत असलेल्या हौदात श्रद्धेने पाणी घालतात.आणि आजही अशी श्रद्धा आहे की श्रीकृष्ण कोण वेगळ्या रुपात येऊन हौदात पाणी टाकतो.. आणि त्याचा स्पर्श होताच हौदातले पाणी खळाळून वर येते.. ही झाली उत्सवाची माहिती..असाच उत्सव आमच्या घरी देखील गेली १५० वर्ष होतो आहे.. संत एकनाथांची एक छोटीशी गोष्ट आज लिहिते..
           संत एकनाथ हे मुळचे श्रीमंत घरातले. त्यांच्या पत्नीचे नाव गिरीजा. त्यांना एक हरी नावाचा मुलगा आणि गंगा, गोदा या दोन मुली. एकनाथ महाराजांचा स्वभाव खूप शांत होता. ते कधीच कोणावर रागवत नसत. तसंच अडल्या-नडलेल्याला ते नेहमीच मदत करीत. एकनाथ महाराजांची थोरवी इतकी की ते तपश्चर्येला बसायचे तेव्हा त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून रोज एक मोठा नाग त्यांच्या शरीराला वेटोळे घालून त्यांच्या डोक्यावर छत्र धरायचा. पण चांगल्या लोकांवर वाईट लोकांची वाईट दृष्टी असतेच! एकनाथांवर चिडणारे सुद्धा लोकं होतेच. त्यांना लोकांच्या नजरेतून पाडण्यासाठी असे वाईट लोक नेहमीच प्रयत्न करायचे! एकदा एक माणूस पैठणला एकनाथांचा वाडा शोधत फिरत असतो. लोक त्याला एकनाथांकडे जाण्याचं कारण विचारतात. तो सांगतो, "ते नेहमी सर्वांची मदत करतात असं मी ऐकलंय. मला माझ्या मुलीचं लग्न करायचं. म्हणून मदत मागायला त्यांच्याकडे जातोय." हे ऐकून या वाईट लोकांना एकनाथांना त्रास देण्याची संधी मिळते. ते माणसाला म्हणतात, "हे बघ.. तू आमचं एक काम कर आम्ही तुला २०० रुपये देऊ." २०० रुपये मिळणार म्हटल्यावर त्या माणसाला आश्चर्य वाटतं.. तो विचारतो, "काय काम करावं लागेल?" ते सांगतात, " एकनाथांना कधी राग येत नाही. तू काहीही करून त्यांना राग आणून दाखव. मग आम्ही तुला २०० रुपये देऊ."
           तो माणूस एकानाथांकडे येतो. आणि त्यांना राग येईल असं वागायला सुरुवात करतो. त्यांच्या पूजेत विघ्न आणतो.. त्यांच्या कामात लुडबुड करतो.. पण एकनाथ महाराज मात्र शांत! ते त्याच्या वागण्यावर अजिबात चिडत नाहीत. थोडा वेळ अशीच मजा सुरु असते. त्या माणसांनी कितीही त्रास दिला तरी एकनाथ महाराज अजिबात चिडत नाहीत. थोड्या वेळानी गिरिजाबाई दोघांना जेवायला बोलवतात. आणि दोघांसाठी जेवण वाढू लागतात. तो माणूस विचार करतो, जर एकनाथांना राग आला नाही तर मला २०० रुपये कसे मिळणार? त्यांना राग आणण्यासाठी तो पुन्हा प्रयत्न करतो. जेवण वाढणाऱ्या गिरीजाबाईंच्या पाठीवर जाऊन तो बसतो. ते बघून एकनाथ म्हणतात, "अगं सांभाळ त्याला! पडेल तो!" गिरिजाबाई एकनाथांना म्हणतात, "अहो, हरीला घेऊन काम करण्याची सवय आहे मला.. हा सुद्धा मला हरी सारखाच ना.. मी कशी बरं याला पडू देईल?"
           एकनाथ आणि त्यांच्या पत्नी गिरिजाबाई आपल्याला स्वतःच्या मुलासारखी वागणूक देत आहेत हे पाहून तो माणूस खजील होतो. आपण इतक्या चांगल्या लोकांना असा त्रास दिला याचं त्याला वाईट वाटतं. आणि तो एकनाथांना सगळा खरं खरं सांगतो. २०० रुपये देणार असा सांगून काही लोकांनी मला असं वागायला सांगितलं हे सर्व सांगतो. एकनाथ हासतात आणि त्याला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे देतात. आणि सांगतात, "जाताना त्या लोकांना सांग की मी तुझ्यावर खूप रागावलो! त्यांना नाराज करू नको.."
अशा शत्रूला सुद्धा नाराज न करणाऱ्या संत एकनाथांना मनापासून नमस्कार...