असं का करायचं??

Posted by मधुरा on 12:47 AM

          रोज कपाळाला टिकली लावत जा! हातात बांगड्या घाल! हे वाक्य सगळ्या मुलींना रोजचे असतील.. नाही? पण हे असंच का करायचं.. आम्हीच का.. कोणी मोठ्यांना घाबरून तर कोणी आंधळा विश्वास ठेऊन चूप बसतात.. पण या प्रश्नांची जोवर समाधानकारक उत्तरं मिळत नाही तोवर कसं मान्य करायचं? अशाच काही प्रश्नांची मला मिळालेली उत्तरं सांगते..
          आपले अलंकार हे सौंदर्य वाढवतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे? आपली भारतीय संस्कृती म्हणजे चालतं बोलतं विज्ञान आहे! आयुर्वेदात सांगितलेली दाब बिंदू पद्धती(acupressure) आपल्या सर्व अलंकारातून सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचली आहे.. इथे प्रत्येकाला आयुर्वेद वाचायला कुठे वेळ आहे? संस्काराच्या रूपाने आपण विज्ञानाचा उपयोग करतो!
          सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे कपाळाला टिकली का लावायची? 
           आधी पुरुष सुद्धा गंध लावायचे! मग आता त्यांना यातून सुटका का? मुलींनाच टिकली लावायला का सांगतात? यावर उत्तर असं की, दोन्ही भुवयांच्या मध्ये जो बिंदू आहे तो रक्तदाब, कपाळदुखी आणि पक्षाघात(paralysis) यापासून दूर ठेवतो.. यात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नाही.. म्हणून आधी दोघेही गंध लावायचे.. तसंच स्त्रियांची कपाळाच्या बरोबर मध्ये टिकली लावण्याची पद्धत होती. कारण तिथे जो acupressure point आहे तो स्त्रियांना होणाऱ्या कमरेच्या दुखाण्यापासून वाचवतो..
           त्यानंतर दुसरा प्रश्न असा की कान का टोचतात?
           बाळ जन्माला आलं की १०-१२ दिवसात मुलगा असो की मुलगी, सोनाराने कान टोचण्याची पद्धत आहे. ते काय त्याचं सौंदर्य वाढवायला?? नाही! हा कानाच्या पाळीवरचा बिंदू दाबला की तिथे असणाऱ्या पेशी कार्यरत होतात, रक्त पुरवठा जोमाने चालू होतो. यामुळे कान-डोळे यांच्या जोडलेल्या नासातून शुद्ध रक्त पुरवठा होऊन बाळाचे डोळेही चांगले राहतात. डोळ्यांना पाणी येणं, कान दुखणं अशा रोगांपासून रक्षण होतं.
         
          सध्या दोनच प्रश्न लिहिलेत.. असे भरपूर प्रश्न उत्तरं आहेत.. ते पुढच्या वेळी लिहीन.. :)