तो तरणार कसा?

Posted by मधुरा on 12:20 AM

          सीतेला मुक्त करायला आणि रावणाचा वध करायला श्रीराम आणि सगळी सेना जेव्हा समुद्रावर सेतू बांधत होते तेव्हाची गोष्ट.. एकदा श्रीराम छावणीतून निघून समुद्रावर जातात. तिथला एक दगड घेतात आणि तो समुद्रात टाकतात. पण तो समुद्राच्या पाण्यावर तरंगत नाही! तो बुडतो.. तेव्हा त्यांना वाईट वाटतं आणि एक उच्छवास टाकतात.. मागून कोणीतरी त्यांच्यापेक्षा जोरात उच्छवास टाकलेला त्यांना ऐकू येतो. वळून बघतात तर हनुमान. आपण टाकलेला दगड बुडला हे कोणीतरी पहिले यामुळे ते खजील होतात..
श्रीराम हनुमानाला विचारतात, "तू इथे कधी आलास?"
हनुमान सांगतो, "मी तर तुम्ही छावणीतून निघाल्यापासून तुमच्या मागेच आहे!"
राम म्हणतात, "मग आता काय झाले ते तू पहिले असशीलच.."
हनुमान सांगतो, "हो.. तुम्ही एक छोटा दगड घेतला आणि आणि तो पाण्यात टाकला.. आणि तो बुडाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटले!"
राम म्हणतात, "पण असे का? माझे नाव घेउन टाकलेले दगड तरले. माझे नाव घेऊन लोक भवसागर तरतात.. आणि मी एक छोटासा दगड टाकला तर तो का बुडावा?"
हनुमान उत्तर देतो, "बरोबरच आहे ना.. रामाने ज्याला धरले तो तरायचाच! पण त्याला रामाने सोडल्यावर तो तरणार कसा? तो तर बुडणारच!"