शिकवण

Posted by मधुरा on 12:35 AM

          गुरु आणि शिष्यांचं नातं खूप सुंदर आणि मजेशीर असतं.. शिष्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी गुरु नेहमी शिष्यांची परिक्षा घेत असतात.. त्यातूनच शिष्यांना चांगला काय वाईट काय याचा बोध होतो.. अशीच ही एक गोष्ट.. गुरु शिष्याची.
           एका गुरूंच्या आश्रमात खूप शिष्य असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा.. पण त्यातही प्रत्येकाला चांगल्या गोष्टींची शिकवण देणं आणि चांगल्या मार्गानी नेण्याचं काम गुरुंचं.. एक दिवस गुरु प्रत्येक शिष्याला एक एक वेताची टोपली देतात आणि सांगतात, "ही टोपली नदीवर घेऊन जा आणि यात पूजेसाठी पाणी घेऊन या." शिष्य विचार करतात या टोपलीला तर छिद्र आहेत! यात पाणी कसं येणार? पण गुरु सांगतात म्हणून सगळे शिष्य टोपली घेऊन नदीवर जातात.

          टोपली नदीत बुडवतात आणि पाणी घेण्याचा प्रयत्न करतात.. पण छिद्राच्या टोपलीत पाणी कसं येणार? पाणी छिद्रातून पडून जातं! पुन्हा प्रयत्न करतात.. पण पुन्हा तेच! पाणी कसं येणार? काही शिष्य विचार करतात गुरूंनी सांगण्यात चूक केली असावी.. टोपलीत फुलं आणायला सांगायचं असेल त्यांना पण चुकून पाणी सांगितलं असेल. आणि ते टोपलीत फुलं घेऊन जातात.. काही शिष्य विचार करतात गुरूंनी आपली मजा केली असेल.. आणि ते तसेच रिकामी टोपली घेऊन आश्रमात परत जातात.
           पण एक शिष्य असा असतो ज्याचा गुरूंवर खूप विश्वास असतो. तो सतत प्रयत्न करत असतो! खूप वेळ जातो पण तो थांबत नाही. टोपली पाण्यात घालून त्यात पाणी भरण्याचा प्रयत्न करताच असतो.. पण छिद्रातून पाणी खाली पडतंच असतं! तो शिष्य थकून जातो.. पण प्रयत्न सुरूच ठेवतो. थोड्या वेळानी त्या टोपलीचं वेत पाण्यामुळे फुगायला लागतं.. आणि टोपलीची छिद्रं बुजतात! त्या टोपलीत शिष्य पाणी भरतो आणि आश्रमात जातो. आणि आणलेलं पाणी बघून बाकी शिष्य चकित होतात.. आपण केलेला मूर्खपणा त्यांना कळतो.
           गुरु येतात आणि शिष्यांनी आणलेलं पाणी बघून खूप आनंदी होतात.. त्या शिष्याला शाबासकी देतात आणि सर्वांना सांगतात, "मी तुम्हाला हाच धडा शिकवण्यासाठी ही परिक्षा घेतली. तुम्ही सगळे काहीही प्रयत्न न करताच परत आले. पण या एकानीच गुरूंच्या सांगण्यावर विश्वास ठेवला! आणि सतत प्रयत्न करत राहिला. म्हणून त्याला यश मिळालं! तुम्ही सुद्धा या नंतर लक्षात ठेवा. कितीही कठीण काम असलं तरी प्रयत्नांनी ते नक्कीच पूर्ण होतं!"