देव आणि दानवांची परीक्षा

Posted by मधुरा on 1:32 AM

          आपल्याला माहितीच आहे कि देव आणि दानव या दोघांमध्ये नेहमीच भांडण असायचं.. आजची गोष्ट पण त्यातलीच एक आहे. एकदा नं देव आणि दानव यांच्यात भांडण झालं की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? दोघेही आपापले गुण सांगू लागले! आम्ही किती युद्ध केले.. युद्धात किती प्रदेश जिंकले.. असा सांगू लागले. पण कोणीही कोणाचे श्रेष्ठत्व मान्य करायला तयार होईना! शेवटी याचे उत्तर घ्यायला देव आणि दानव ब्रम्हदेवाकडे गेले. आणि आपली बाजू मांडू लागले. या भांडणावर ब्राम्हदेवांनीच निकाल द्यावा अशी सर्वांनी मागणी केली. हे सर्व ऐकून ब्रम्हदेव सगळ्यांना सांगतात, " हे बघा.. आपण एक परीक्षा घेऊ. जो या परीक्षेत खरा उतरेल तो जिंकेल.."
           ब्रम्हदेवांच्या या पर्यायाला सगळे तयार होतात.. ब्रम्हदेव सांगतात, " तुमची परीक्षा काही जास्त मोठी नाही आहे. तुम्हाला एका खोलीत जेवायला वाढण्यात येईल. पंचपक्वन्नांचं जेवण तुम्हाला मिळेल. पण एक अट आहे. तुमचे हात कोपरा पासून बांधलेले असतील. त्यामुळे तुम्हाला हात वाकऊन खाता येणार नाही. आणि एकदा सगळे देव जेवायला बसतील आणि एकदा सगळे दानव. कोण आधी जेवेल ते तुम्हीच ठरवा!" पंचपक्वान्नाचं जेवण मिळणार हे ऐकून सगळ्या राक्षसांची भूक खवळते! ते म्हणतात, "आम्हीच आधी जेवायला बसू. देव आमच्या नंतर जेवतील.."
           ब्रम्हदेव ठरल्या प्रमाणे सगळ्या दानवांच्या जेवणाची व्यवस्था करायला सांगतात. एका खोलीत सगळ्यांचे पंचपक्वानांनी भरलेले ताट मांडण्यात येतात. सगळे दानव येतात आणि जेवायला बसतात. पण सगळ्यांचे हात कोपरापासून काडीने बांधलेले! कोणालाही हात वाकवता येत नाही. आणि हात वाकवल्याशिवाय कसं जेवणार? हात जर वाकला नाही तर हातातला घास तोंडात कसं जाणार? पण सगळ्यांना भूक इतकी लागलेली असते की काही विचार न करता सगळे जेवण सुरु करतात. ताटातला घास हातात घेतला की हात न वाकता सरळ वर जातो असं पाहून ते युक्ती करतात. हात वर नेऊन तिथूनच घास तोंडात टाकतात! पण कधी तो घास कपाळावर पडतो.. कधी नाकावर कधी डोळ्यावर! कोणाचा गुलाबजाम नाकावर पडतोय.. कोणाची कढी डोळ्यावर पडतेय.. कोणी तोंड ताटात घालून खातात तर कोणी ताट वर उचलून तोंडात अन्न टाकायचा प्रयत्न करतात... अशी सगळ्यांची सर्कस सुरु होते! त्यांचं पूर्ण अंग चिकट चिकट होतं! पण भूक मात्र जात नाही. कारण जेवण पोटात न जाता इकडे तिकडे सांडत असतं! थोड्या वेळानी ब्रम्हदेव येतात आणि सांगतात, "तुमची जेवणाची वेळ संपली. आता उठा. आता सगळे देव जेवतील." सगळे भुकेले दानव चिडत चिडत उठतात. आणि चिकट झालेले अंग स्वच्छ करायला नदीकडे अंघोळीला जातात.
           आता देवांच्या जेवणाची तयारी केली जाते. पंचपक्वान्नाचं जेवण वाढलं जातं सगळे देव येतात आणि जेवायला बसतात. त्यांचे सुद्धा हात बांधलेलेच असतात. भूक लागलेली असतेच! पण देव दानवांसारखा आधाशीपणा करत नाहीत! ते आधी डोळे बंद करून नमस्कार करतात. मग विचार करतात की हात बांधलेले असताना आपण पोटभर कसं जेवायचं? त्यांना एक युक्ती सुचते.. ते आपल्या ताटातला घास समोर बसलेल्याला खाऊ घालतात. असंच एकमेकांसमोर बसून त्यांचं जेवण सुरळीत सुरु होतं... समोर बसलेल्याला काय हवं काय नको असं विचारत विचारत ते एकमेकांना जेऊ घालत असतात. तुला गुलाबजाम देऊ का? पोळी भाजी खातोस का? खीर घे नं.. असं आग्रह करत करत देव आरामात जेवत असतात!
           इकडे आंघोळीला गेलेले दानव परत येतात. आणि आपल्या सारखीच देवांची पण कशी फजिती होते ते बघू असं ठरऊन ते देव जेवत असलेल्या खोलीजवळ येतात आणि लपून छपून देवांना बघू लागतात. पण पाहतात तर देव मजेत एकमेकांना भरवत आहेत!! देवांनी केलेली युक्ती पाहून दानव खजील होतात..
देवांचा पोटभर जेवण होतं. आणि ब्रम्हदेव देव आणि दानव दोघांना पण बोलवतात. आणि सांगतात, " तुम्हा दोघांची पण सारखीच परीक्षा घेतली. पण दानवांनी जेवण दिसल्यावर भूकेसमोर विचार केलाच नाही. पण देवांनी मात्र विचार केला. दुसऱ्याला जेऊ घातलं.. म्हणूनच एकमेकांना जेऊ घालून सगळ्यांचं पोट भरलं.. या वरून सिद्ध झालं की देवच श्रेष्ठ आहेत!"
          आपण सुद्धा आपल्यातल्या दानव वृत्तीला काढून चांगले वागले पाहिजे.. दुसऱ्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. तरंच आपले व्यक्तिमत्व चांगले बनेल!